कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (दि. 4) शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी काँग्रेसचे बंडखोर राजू लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नसल्याने मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. आता येथे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने पक्षाला धक्का मानला जात आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी सुरूवातीला काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू लाटकर यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये काँग्रेसने त्यांचा उमेदवार बदलला आणि मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर राजू लाटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.
शेवटच्या क्षणापर्यंत राजू लाटकर यांची मनधरणी करण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश आले नाही. राजू लाटकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यास ठाम होते. त्यानंतर शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला अर्ज मागे घेतला.
खासदार शाहू महाराजांची प्रतिक्रिया –
मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही, ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवले की अशा परिस्थितीत निवडणूक लढायची नाही.”
सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी –
या राजकीय घडामोडींदरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील हे मालोजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. शाहू महाराजांकडेही सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही जे केले आहे ते बरोबर नाही, माघार घ्यायचीच होती तर अगोदर का नाही सांगितलं? मला तोंडघशी का पाडलं? माझी नाचक्की का केली? असा सवाल सतेज पाटील यांनी शाहू महाराज आणि मालोजीराजे यांना केला आहे.





