कोल्हापूर उत्तर मतदारसंघ: अपक्ष राजेश लाटकर हेच काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार, शाहू महाराजांची घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आधी राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक नगरसेवकांच्या विरोधामुळे त्या ठिकाणी त्यांचे नाव मागे घेण्यात आले आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यावर राजेश लाटकर हे नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरला. मात्र शेवटच्या दिवशी मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर बराच गोंधळ पहायला मिळाला. त्यानंतर आता राजेश लाटकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार ठरविण्यात आले आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली.
कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर अशी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मधुरिमाराजेंचा अर्ज मागे –
दरम्यानच्या काळात राजेश लाटकर यांनी दोन वेळा शाहू महाराजांची भेट घेतली आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली. राजेश लाटकर यांच्या वडिलांनीही शाहू महाराजांकडे तशी मागणी केली होती. त्यामुळे शाहू महाराजांनी मधुरिमाराजे यांच्या अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजेश लाटकर हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. त्यामुळे शाहू महाराजांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मधुरिमाराजे छत्रपती या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यांच्या माघारीनंतर कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार राहिला नाही. तर राजू लाटकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले.
दरम्यान, मधुरिमाराजेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले होते. त्यांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला. या सर्व प्रकरणावर स्वतः शाहू महाराजांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठीच मधुरिमाराजेंचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणं मान्य नव्हतं. एकाच कुटुंबात दोन पदं नकोत ही आमची पहिल्यापासून भूमिका होती. राजेश लाटकर यांनी माघार घेतली तरच निवडणूक लढवायची असं ठरलं होतं. काँग्रेस पक्षाची गरज म्हणूनच मधुरिमाराजेंनी उमेदवारी स्वीकारली होती. राजेश लाटकर हे काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करु.
सतेज पाटलांवर शाहू महाराज काय म्हणाले?
सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत.
माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो.
विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे.





