ठाणे- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 यावर्षी तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकाराचा वापर तृतीयपंथी मोठ्या संख्येने करत असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान करण्यात आलेल्या नोंदीनुसार ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता देशात सर्वात जास्त तृतीयपंथी मतदार हा ठाणे जिल्ह्यात असल्याचे समोर येत आहे. (Maharashtra Assembly Election 2024) ठाणे जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघांत 72,29,339 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात 38,45,42 पुरुषांसह 33,82,883 महिला मतदारांचा समावेश आहेत. ठाणे जिल्ह्याच्या या एकूण मतदारसंख्येत तृतीयपंथी मतदार 1415 असून ही मतदार संख्या देशामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची नोंद झाल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 18 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 244 मतदार मतदानासाठी सज्ज आहेत. मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून 6955 मतदान केंद्रे आयोजित केले असून, त्यात एका केंद्रात 1500 पेक्षा जास्त मतदान असलेले 61 सहायकारी मतदान केंद्रांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात महिलांकडून चालविण्यात येणारे 18 मतदान केंद्र असून, दिव्यांगांकडून चालवण्यात येणारे 18 आणि युवकांचे 18 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान करण्याऱ्या मतदारांमध्ये ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. 2004 व 2009 लोकसभा निवडणुकीत काळात तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदार यांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार 2019 च्या तुलनेत आता तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची असल्याची नोंद झाली आहे.