Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का! समीर भुजबळांनी दिला राजीनामा

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव – मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना समीर भुजबळ यांचा राजीनामा घ्या अशा सूनाचा केल्या होत्या. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे.
काय लिहिले राजीनाम्यामध्ये?
“साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्षापासून बूथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली”. “मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहेत.
नांदगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगावमधील दहशतीचं वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्विकारावा अशी विनंती”.असे समीर भुजबळ यांनी आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे.
समीर भुजबळ अपक्ष लढणार
समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते.मात्र महायुतीमध्ये ही जाग शिंदेच्या शिवसेनकडे गेली आहे. त्यामुळे या स्थितीत समीर भुजबळांसमोर अपक्ष लढणे किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करणे हे दोन पर्याय होते. त्यामुळे समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या ठिकाणी महायुतीकडून सुहास कांदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढत होण्याची शक्यता आहे.





