धोक्याची घंटा.! ‘HMPV’ ने चिंता वाढवली, देशातील एकूण रुग्णांची संख्या एकदा पहाच…

HMPV cases in India – राज्यात एचएमपीव्ही व्हायरसचे कालच नागपुरात दोन रुग्णांची नोंद करण्यात आली. याला चोवीस तास उलटत नाहीत तोच मुंबईतही एका सहा महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका सहा महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. देशभरात आतापर्यंत ९ जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईत ज्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे ती फक्त सहा महिन्यांची आहे. १ जानेवारीला गंभीर खोकला, छाती जड होणे आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत घसरल्याने मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नवीन रॅपिड पीसीआर चाचणीद्वारे तपासणी केली असता तीला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले. मुलीवर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्ससारख्या औषधांसह उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पाच दिवसांनी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत ९ जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक ३, तर कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय प. बंगाल आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण नोंदवला गेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे की एचएमपीव्हीविषयी घाबरण्याची गरज नाही. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की हा विषाणू नवीन नाही. तो यापूर्वीही दिसून आला आहे आणि सध्या तो पुन्हा सक्रिय झाला आहे. लवकरच योग्य ती नियमावली जाहीर केली जाईल. तसेच केंद्र सरकारने राज्यांना यासंदर्भात माहिती पुरविण्याचा निर्णय घेतला असून माध्यमांनी अधिकृत माहितीच प्रसारित करावी, असेही त्यांनी सुचवले.





