मंचर, (प्रतिनिधी) – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे क्षेत्र भीमाशंकर येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे आजारातून लवकरच बरे व्हावे, यासाठी रुद्र महाजलाभिषेक करण्यात आला. तसेच तालुक्याच्या विविध गावातील ग्रामस्थ वळसे पाटील यांच्या स्वास्थासाठी प्रार्थना करत आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या खुब्याला व हाताला मार लागला आहे. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही करण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील तमाम जनतेचे वळसे पाटील यांच्यावर आगळे वेगळे प्रेम असल्यामुळे एक वेगळीच अस्वस्थता पसरली होती. आपला नेता या आजारपणातून लवकरच बरा होऊन समाजकार्यासाठी आपल्यामध्ये यावा, यासाठी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे ब्रह्मवृंद व गुरव बांधव यांच्याकडून तब्बल अडीच तास रुद्र महाजलाभिषेक करण्यात आला. पहाटेची पाच वाजेची आरती झाल्यानंतर ह्या जलभिषेकास सुरुवात करण्यात आली. आंबेगाव तालुक्याचे जनतेच्या वतीने यजमान म्हणून प्रसाद गवांदे, दत्तात्रय कौदरे, चंद्रकांत कौदरे व गोरक्ष कौदरे यांनी अभिषेक केला. आदिवासी जनतेचे नेते सुभाषराव मोरमारे व भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुद्राभिषेकाच्या आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, प्रसाद गवांदे, विश्वस्त रत्नाकर कोडिलकर, दत्ताञय कौदरे, आशिश कोडिलकर, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, गोरक्ष कौदरे यावेळी उपस्थित होते.