Pune District : दौंड तालुक्यात महाडीबीटीचे सतराशे शेतकऱ्यांचे १७ कोटींचे अनुदान रखडले
Pune District : सध्या आर्थिक वर्ष २०२५-२६ समाप्त होण्याच्या मार्गावर असताना अनुदान वितरणातील विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चौफुला : दौंड तालुक्यात कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत महाडीबीटी प्रणालीवरील अनुदान वितरणात मोठा विलंब होत असल्याचे समोर आले आहे. २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तालुक्यात एकूण ९,१०४ अर्ज प्रक्रियेत असून त्यापैकी ६,०५३ अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत. तर २,७६५ लाभार्थ्यांनी इनव्हॉईस अपलोड केले असून २,४४५ प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाली आहे.
मात्र, इतक्या प्रक्रियेनंतरही केवळ ७८६ लाभार्थ्यांनाच अनुदान वितरित झाले असून तब्बल १,७०० प्रकरणांमध्ये सुमारे १५.५४ कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अनुदानापासून वंचित राहिले आहेत. सध्या आर्थिक वर्ष २०२५-२६ समाप्त होण्याच्या मार्गावर असताना अनुदान वितरणातील विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी योजनांअंतर्गत साहित्य खरेदी करूनही अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यामुळे महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित प्रकरणांना तातडीने गती देण्यासाठी कृषी विभाग तसेच राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.
“मी महाडीबीटी योजनेअंतर्गत अर्ज करून पाच ते सहा महिन्यांपासून प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. सर्व कागदपत्रे आणि इनव्हॉईस अपलोड करूनही अजून अनुदान मिळालेले नाही. सध्या पीक कर्जाचा भरणा करायचा आहे. जर अनुदान लवकर मिळाले तर माझे आर्थिक काम सोयीस्कर होईल.”
– हनुमंत दिवेकर, शेतकरी
हेही वाचा : Pune Zilla Parishad Budget: पुणे जिल्हा परिषदेचा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प





