Mahabeej : महाबीजचा खरीप हंगामासाठी सुसज्ज आराखडा! QR कोडसह अडीच लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

मुंबई | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! महाबीजने आगामी खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. हे बियाणे साथी पोर्टलच्या QR कोडसह बाजारात उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांना त्यामार्फत बियाण्याचे स्त्रोत, प्रक्रिया व गुणवत्ता यांची सविस्तर माहिती मिळणार आहे.
हे बियाणे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून अनुदानित दरात मिळणार असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या हंगामात ७१,००० क्विंटल बियाणे नव्या संशोधित वाणांचे असून, तूर, मूग, उडीद, धान, बाजरी, नाचणी व सोयाबीन या पिकांचे बियाणे आकर्षक अनुदान दरात मिळणार आहे. काही वाणांसाठी १००% अनुदानही उपलब्ध आहे.
महाबीजने विक्रेत्यांसोबत बैठका घेऊन संपूर्ण राज्यात बियाणेवितरणाची तयारी केली आहे. शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत. शिवाय, “महाबीज वार्ता” या यूट्यूब चॅनेलद्वारे शेतकऱ्यांना नव्या वाणांची माहिती, सल्ले व अनुभव सहज उपलब्ध होत आहेत.
५० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाबीजचा हा विश्वासार्ह आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम शेतकऱ्यांसाठी मोठा वरदान ठरणार आहे.





