Mahabaleshwar Weekly Market: महाबळेश्वरचा आठवडे बाजार आता ‘या’ नवीन ठिकाणी भरणार; नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी थेट मैदानावर
Mahabaleshwar Weekly Market: नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडून नव्या जागेची पाहणी; व्यापाऱ्यांना नियोजनबद्ध गाळे देणार.

Mahabaleshwar Weekly Market – महाबळेश्वर शहरातील एल. सी. डिसोजा रस्त्यावर अनेक वर्षांपासून भरत असलेला ऐतिहासिक आठवडे बाजार आता पालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज पार्किंगच्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच नगरसेवकांनी नव्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. बाजार स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर तातडीने स्वच्छ करुन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
एल. सी. डिसोजा रस्त्यावर भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना ये- जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पर्यटन हंगामात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने बाजार स्थलांतराचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. नवीन ठिकाणी बाजार भरल्यानंतर वाहनतळ आणि बाजार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिक व पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच बाजारातील व्यापाऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने गाळे वाटप करण्यात येणार असून शिस्तबद्ध व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. पाहणीदरम्यान बाजार परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आदी मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यात शहरातील प्रमुख नगरसेवक, पालिका अधिकारी तसेच व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. जागेची स्वच्छता आणि प्राथमिक नियोजन पूर्ण झाल्यानंतर आठवडे बाजार नव्या जागेत अधिकृतपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.





