Mahabaleshwar News : तापोळा-बामणोलीत पर्यटकांची मोठी कोंडी; ‘या’ कारणामुळे अचानक सर्व व्यवहार ठप्प
Mahabaleshwar News : जिओ, एअरटेल, व्हीआय कंपन्यांचे नेटवर्क दोन दिवसांपासून पूर्णपणे गायब; ऑनलाईन बँकिंग आणि युपीआय व्यवहार ठप्प झाल्याने नागरिक हैराण.

Mahabaleshwar News – महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा-बामणोली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्क पूर्णपणे गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक आणि पर्यटन व्यवसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिओ, एअरटेल, व्हीआय यांसारख्या प्रमुख मोबाइल कंपन्यांची सेवा अचानक ठप्प झाली असून, काही ठिकाणी फक्त बीएसएनएलचे सिग्नल अत्यंत कमजोर स्वरूपात उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.
मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे स्थानिक नागरिकांची दैनंदिन कामे पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत. ऑनलाइन बँकिंग, यूपीआय व्यवहार, हॉटेल बुकिंग, पर्यटकांशी संपर्क तसेच कुटुंबीयांशी संवाद या सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहेत. विशेष म्हणजे, बोटिंग, ट्रेकिंग आणि जंगल परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. एखादा अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास मदतीसाठी संपर्क साधणेही अशक्य बनले आहे.
पर्यटकांनीही प्रशासन आणि मोबाइल कंपन्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तापोळा म्हणजे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून आलो; पण येथे आल्यावर पूर्णपणे नेटवर्क ब्लॅकहोलमध्ये अडकल्यासारखे झाले,” अशी प्रतिक्रिया काही पर्यटकांनी दिली. अनेक पर्यटकांनी मध्येच मुक्काम रद्द करून परतीचा निर्णय घेतल्याने स्थानिक हॉटेल, होमस्टे, बोटिंग आणि पर्यटन व्यवसायाला आर्थिक फटका बसत आहे.
ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तात्काळ नवीन मोबाइल टॉवर्स उभारणे, सिग्नल बूस्टर बसवणे, बीएसएनएल व्यतिरिक्त इतर कंपन्यांनी सेवा विस्तार करणे तसेच तापोळा-बामणोली परिसरातील डिजिटल आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याची मागणी केली आहे.
नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण
स्थानिकांच्या मते, तापोळा-बामणोली परिसरातील नेटवर्क समस्या ही नवीन नाही. डोंगराळ भौगोलिक परिस्थिती, अपुरे मोबाइल टॉवर्स, खराब देखभाल आणि संबंधित कंपन्यांचे दुर्लक्ष यामुळे हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नेटवर्क पूर्णपणे कोलॅप्स होणे म्हणजे प्रशासन आणि दूरसंचार कंपन्यांच्या नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण असल्याची टीका होत आहे.



