Mahabaleshwar News: गेल्या वर्षाचा रेकॉर्ड मोडणार? महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ, पर्यटकांची तुफान गर्दी
Mahabaleshwar News: 15 ऑगस्टच्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटकांनी गजबजले; वेण्णा लेक, लिंगमळा धबधब्यावर पर्यटकांचा मनमुराद आनंद.

Mahabaleshwar News – 15 ऑगस्टपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. पावसाच्या सरी, दाट धुके, थंड हवा आणि डोंगररांगांमधून कोसळणारे धबधबे यामुळे या पर्यटनस्थळांचे रूप पालटले असून, पर्यटक या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. महाबळेश्वर परिसरात सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, येथील डोंगर दाट धुक्याच्या चादरीत हरवून गेले आहेत.
हिरव्यागार डोंगररांगा आणि ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पावसात भिजण्याचा आनंद घेत, पर्यटक फोटो आणि सेल्फी काढताना दिसत आहेत. वेण्णा लेकमध्ये नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. त्याचबरोबर परिसरात घोडेस्वारीचा आनंदही घेत आहेत. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्वरही गर्दी होत आहे. महाबळेश्वर परिसरातील लिंग मळा धबधबा, प्रतापगड आणि इतर घाटांमध्ये कोसळणार्या धबधब्यांमध्ये भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत संध्याकाळी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. शोभेच्या वस्तू, स्वेटर, चप्पल आदींच्या खरेदीबरोबरच गेम झोन शॉप्समध्ये पर्यटक करमणुकीचा आनंद लुटत आहेत. यंदा महाबळेश्वरमधील एकूण पर्जन्यमान 250 इंचांच्या जवळ पोहोचले आहे. मागील वर्षी 17 ऑगस्टपर्यंत 168.307 इंच (4275 मिमी) पावसाची नोंद झाली होती. यंदा याच कालावधीत तब्बल 220.811 इंच (5608.60 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये 243.99 इंच (6117.50 मिमी) पाऊस झाला होता. यंदा पाऊस हा टप्पा गाठणार का, याकडे लक्ष लागले आहे.




