महाबळेश्वर मुख्य बाजारपेठ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय देशपांडे यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील कामाची पाहणी

महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील मुख्य बाजारपेठेतील सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाबळेश्वर पोलीस ठाणे या भागाचे काम सुरू होणार आहे . सोमवार दि. २४ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय देशपांडे यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाबळेश्वर पोलिस ठाणे या भागाची पाहणी केली.
तसेच त्यांनी स्थानिकांची व्यापाऱ्यांची बैठक घेतली असून त्यांना कामाचे स्वरूप समजावून सांगत कामाचा दर्जा याच बरोबर वेळेत काम पूर्ण करून घेतले जाईल, याची शाश्वती दिली. याचबरोबर येथील रहिवाशांकडून येथील गटार ड्रेनेज सिस्टिम याबाबत माहिती घेतली. तसेच काम सुरू असताना अडथळा येऊ नये, याकरिता या भागात असलेले केबल व्यावसायिक, टेलिफोनचे खांब तसेच पथदिव्यांचे खांब काढून घेण्याबाबत संबंधित व्यावसायिकांना तसेच खात्यांना सूचना दिल्या आहेत. याबाबत स्थानिकांनी पूर्णपणे सहकार्याची भूमिका दर्शवली आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुशोभिकरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होत असल्याने त्यांचे आभार मानले.
मुख्य बाजारपेठ सुशोभिकरणाच्या शुभारंभ प्रसंगी येथील हनुमान मंदिर येथे अजय देशपांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. या वेळी नगर परिषदेचे आबाजी ढोबळे, ॲड. संजय जंगम, विजू भाऊ नायडू, संतोष जंगम, उमेश भिसे, महेश गुजर, महेश दिनेश भिसे, राहुल तांबे, कुणाल साळुंखे, अमित माळवदे, प्रताप जाधव, ओंकार दीक्षित, शंतनु बगाड, रोहन कोमटी, संजय तोडकर, सुमित क्षीरसागर याचबरोबर विशेष सल्लागार म्हणून सूर्यकांत बडके व ठेकेदार निलेश आगवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.





