Mahabaleshwar – तळदेव गटातील 105 गावांमध्ये होमस्टे, इको-टुरिझम, ट्रेकिंग मार्ग, कृषी-पर्यटन, स्थानिक हस्तकला व लघुउद्योगांना चालना देण्याची योजना आहे. यामुळे युवकांना गावातच रोजगार, महिलांना स्वयंरोजगार आणि शेतकर्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून स्थलांतर रोखणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील विकासाचे स्वप्न साकार करणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ यांनी दिली. महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटातून तब्बल तीन हजार मतांच्या फरकाने विजयी होत जिल्हा परिषदेत दमदार प्रवेश करणारे अजित सपकाळ यांनी दै. प्रभातशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तळदेव गट हा मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रभावक्षेत्रात मानला जातो. अशा राजकीय पार्श्वभूमीत अजित सपकाळ यांचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असली, तरी आता त्यांना विकासकामांद्वारे आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागणार आहे. या अनुषंगाने बोलताना अजित सपकाळ म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या नवीन महाबळेश्वर संकल्पनेतून 105 गावांच्या विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागाला शहरांच्या बरोबरीने उभं करण्याची ही संकल्पना असून पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा यांचा समन्वय यात साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.पायाभूत सुविधांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, सुरक्षित दळणवळण, वीज व पाणीपुरवठा सुधारणा, शाळा आणि आरोग्य केंद्रांची उभारणी यावर भर देणार असून विशेषतः प्रतापगड किल्ला परिसरासाठी प्रस्तावित निधीमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि आसपासच्या गावांना आर्थिक लाभ होईल, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार पर्यावरण संरक्षणालाही या आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे. इको-सेंसिटिव्ह झोनमध्ये जीआयएस-आधारित नियोजन, झाडतोडीवर नियंत्रण आणि बेकायदेशीर बांधकामांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे. आज या 105 गावांमध्ये बेरोजगारी, अपुरे दळणवळण आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही वस्तुस्थिती आहे. अनेक कुटुंबांनी संघर्ष करत आयुष्य काढले आहे. हा विकास आराखडा त्या संघर्षाला दिशा देवू शकेल, असा विश्वास अजित सपकाळ यांनी व्यक्त केला.