Mumbai News : मातंग समाजाच्या वतीने मंत्रालयावर महाआक्रोष मोर्चा; लाखों समाजबांधव उद्या मुंबईत धडकणार

मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून या घटकामधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बलांना न्याय मिळावा, यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मंगळवार, २० मे रोजी आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे.
अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा, यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज 20 मे रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईवर महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात मातंग समाजातील मान्यवर नेते व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणात उपवर्गीकरण करण्यास गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना परवानगी दिली आहे. याद्वारे दलित आणि आदिवासी समाजातील विविध मागास उप-जातींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दलित व आदिवासी समाजातील काही दुर्बल उपजातींनी आरक्षणांतर्गत उपवर्गीकरण करावे, अशी मागणी सरकारकडे लावून धरली आहे.
याबाबत बोलताना काँग्रेस नेते रमेश बागवे म्हणाले की, उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल. हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे, अशी समाजाची मागणी असल्याची प्रतिक्रिया बागवे यांनी दिली
हे प्रमुख व्यक्ती राहणार उपस्थित
विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे
आमदार सुनील कांबळे
आमदार जितेश अंतापूरकर
माजी आमदार मधुकरराव घाटे
माजी आमदार नामदेव जयराम ससाणे
माजी मंत्री रमेश बागवे
माजी मंत्री दिलीप कांबळे
आण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे





