Maha Vikas Aghadi – महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एकमेव जागेवरून घटक पक्षांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुढे करत आता या जागेवर आपला दावा केला आहे. ठाकरेसेनेने या जागेवर आपला पहिला हक्क असल्याचे सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी राज्यसभा निवडणुका आणि जागावाटपावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेची जागा त्यांना देण्यात यावी असा प्रस्ताव मांडला आहे. वडेट्टीवार म्हणाले, राष्ट्रवादी(शप) पक्ष त्यांच्या पक्षाच्या वरीष्ठांशी सल्लामसलत करेल, तर ठाकरेसेना देखील त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्ष आपापल्या नेत्यांशी सल्लामसलत करतील. राज्यसभा आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरेसेना आणि काँग्रेस या दोघांनीही या जागेवर दावा केला असला तरी महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढवेल. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल. आघाडीतील भागीदारांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली तर आघाडीचा विजय निश्चित असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. दरम्यान, ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेत आघाडीच्या एकमेव जिंकण्यायोग्य जागेवर आपला पक्षाचा दावा मांडला होता. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता राज्यसभेची जागा त्यांच्या पक्षाची आहे आणि आघाडीमध्ये निश्चितच त्या दिशेने चर्चा होईल असे ठाकरे यांनी म्हटले होते.