Mahakumbh 2025: कशी झाली कुंभमेळ्याची सुरुवात? जाणून घ्या याचे धार्मिक महत्त्व आणि इतिहास

Mahakumbh 2025: कुंभमेळा… भारतीय परंपरेत, विशेषता हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा. कुंभमेळ्याची परंपरा ही शेकडो वर्षांपासून चालत आहे. दर 12 वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात. हा मेळा ज्या शहरातील नद्यांच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो, त्या नद्यांना देखील भारतीय परंपरेत विशेष महत्त्व प्राप्त आहे.
यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थाने खास आहे. कारण, यावेळी महाकुंभ मेळा भरणार आहे. तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. ही एक विशेष ज्योतिषशास्त्रीय किंवा खगोलशास्त्रीय घटना मानली जाते.
यंदाच्या महाकुंभ मेळ्याचे आयोजन हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारकडून विशेष तयारी देखील करण्यात आली आहे. जगभरातून जवळपास 40 कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावण्याची शक्यता आहे.
या लेखातून महाकुंभ मेळ्याचे आयोजन कधी पासून केले जात आहे, याचे आयोजन कोणत्या शहरांमध्ये केले जाते व यावर्षी होणाऱ्या महाकुंभचे विशेष महत्त्व का आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कधीपासून केले जात आहे आयोजन ?
कुंभमेळ्याचा उल्लेख प्राचीन कथा, ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या सोहळ्यामागील प्राचीन कथा विशेष लोकप्रिय आहे. समुद्र मंथनावेळी देव आणि दानवांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी मोठा संघर्ष झाला. त्यावेळी या अमृतातील काही थेंब प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी पडले. त्यामुळे या शहरांमध्येच या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते.
दर 12 वर्षांनी या सोहळा आयोजन करण्याचे कारणही खास आहे. अमृत असलेले कलश स्वर्गात पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले होते. देवांसाठी 1 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष मानले जातात. त्यामुळे दर 12 वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. पुराणांमध्येही कुंभ या शब्दाचा उल्लेख आढळतो.
पहिल्यांदा या सोहळ्याचे कधी आयोजन करण्यात आले होते, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. परंतु, 850 वर्षांपूर्वी आदि शंकराचार्य यांनी याची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. शाही स्नानाची सुरुवातही 14 ते 16व्या शतकात झाली असण्याचा अंदाज आहे. चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने त्याच्या लिखाणामध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या काळात अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे नमूद केले आहे. मुगलकाळात 1665 मध्ये लिहिलेल्या खुलासातु-त-तारीख गॅजेटमध्येही याचा उल्लेख आहे.
कुंभमेळ्याचे कोणत्या शहरांमध्ये आयोजन केले जाते?
कुंभमेळा ज्या शहरांमध्ये आयोजित केला जातो, त्यांनाही विशेष म्हत्त्व आहे. कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या शहरांमध्ये याचे आयोजन केले जाते. याचे महाकुंभ, पूर्णकुंभ आणि अर्धकुंभ असे 3 प्रकार आहेत. यातील केवळ महाकुंभ मेळ्याचे आयोजन हे प्रयागराज येथे केले जाते.
प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदी जेथे एकमेकांना येऊन मिळतात त्या संगम किनारी मेळ्याचे आयोजन केले जाते. याशिवाय, दर 12 वर्षांनी नाशिकच्या गोदावरी, उज्जैनच्या शिप्रा आणि हरिद्वारच्या गंगा नदीच्या किनारी केले जाते. दर 12 वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथे क्रमाने हा धार्मिक सोहळा होता. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2026-27 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे.
यावर्षी कधी सुरू होणार महाकुंभ ?
यंदाचा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे पार पडणार आहे. 12 कुंभमेळ्यांचे चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे 144 वर्षांनी होणाऱ्या यावर्षीच्या महाकुंभ मेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
यंदा पौष पौर्णिमेच्या दिवशी 13 जानेवारीला या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होईल. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या महाकुंभ मेळ्याचा समारोप होईल. एकूण 45 दिवस हा धार्मिक सोहळा सुरू असेल. उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या महाकुंभमध्ये 123 देशांमधून जवळपास 40 कोटी नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2013 मध्ये आयोजन करण्यात आलेल्या मेळ्याला 20 कोटी भाविक उपस्थित होते. त्यामुळे एवढ्या लोकांसाठी सरकारकडून विशेष तयारी देखील करण्यात आली आहे.
कुंभमेळ्यातील शाही स्नानाला आहे विशेष महत्त्व
कुंभमेळ्यातील शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे. कुंभमेळ्यात शाही स्नान करणाऱ्या व्यक्तींची त्याने केलेल्या पापातून मुक्तता होते, असे मानले जाते. याशिवाय, पितृशांती व मोक्षप्राप्तीसाठीही हे स्नान महत्त्वाचे आहे.
महाकुंभ मेळ्यादरम्यान शाही स्नानासाठीच्या काही ठराविक तारखांना खास महत्त्व आहे. यंदा शाही स्नानासाठी 6 दिवसांना विशेष महत्त्व आहे. 13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा, 14 जानेवारी 2025 – मकर संक्रांती, 29 जानेवारी 2025 – मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी 2025 – वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी 2025 – माघ पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्री या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्या पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. सुरुवातीला साधू आणि संतांचे स्नान होते. त्यानंतर भाविक स्नान करतात.
यंदाच्या महाकुंभसाठी सरकारने काय तयारी केली आहे?
कुंभ मेळ्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारकडून यासाठी विशेष तयारी केली जात आहे. सरकारकडून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. गंगा नदीवर 6 लेनचा पुल उभारण्यात आला आहे. याशिवाय, 4 लेनचा रेल्वे ओव्हरब्रिज देखील तयार केला आहे.
संगमच्या 12 किमी भागात स्नान घाट बांधण्यात आले आहेत. स्नान घाटावर महिलांसाठी चेंजिग रुमची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छता व सुरक्षेवर देखील विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय, कुंभमेळ्याच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी हजारो बसेस चालवल्या जाणार आहेत.
यंदाचा कुंभमेळा हा डिजिटल कुंभमेळाही आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. 11 भाषांमधील महाकुंभ मेळा अॅप देखील उपलब्ध करण्यात आले आहे.
महाकुंभ मेळ्याचे आर्थिक गणित
महाकुंभ मेळ्यासाठी सरकारकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून यासाठी 2022-23 मध्ये 621.55 कोटी रुपये, 2023-24 मध्ये 2500 कोटी आणि 2024-25 च्या बजेटमध्ये 2500 कोटींची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय, केंद्र सरकारकडून 2100 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती.
या धार्मिक सोहळ्यातून सरकारला 2 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. तसेच, हजारो नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. 2019 मध्ये आयोजित अर्धकुंभद्वारे सरकारला 1.2 लाख कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. यंदाच्या कुंभमेळ्यात 40 ते 50 कोटी भाविक हजेरी लावण्याचा अंदाज आहे. परदेशी नागरिक देखील या मेळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यातून सरकारला मोठा आर्थिक फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.





