Magh Ganesh Utsav 2026: महागणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव मनमोहक फुलांच्या सजावटीने नटला गाभारा

पहाटेचा अभिषेक, गणेश याग आणि अवधूत चक्रांकित महाराजांचे कीर्तन; रांजणगावच्या माघ उत्सवात भाविकांची मांदियाळी.
Magh Ganesh Utsav 2026: रांजणगाव गणपती – श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थानच्या वतीने माघ गणेशोत्सव २०२६ निमित्त १९ ते २३ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिराला करण्यात आलेल्या भव्य आणि आकर्षक फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी या उत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली असून, पाच दिवसांच्या या सोहळ्याने रांजणगाव नगरी भक्तीमय झाली आहे.
गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे ५ वाजता अभिषेक करण्यात आला, तर सकाळी ७ वाजता मुख्य विश्वस्त व सौ. रुपाली ओमकार देव यांच्या हस्ते गणेश याग संपन्न झाला. दुपारी १२ वाजता धाकटे देव घराण्यांच्या हस्ते महापूजा पार पडल्यानंतर पालखीचे उत्तरद्वार यात्रेकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी श्री महागणपती भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
सायंकाळी ६ वाजता मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा झाली, तर रात्री ९ ते ११ या वेळेत अवधूत चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे गणेश जन्मकीर्तन झाले.उत्सवानिमित्त देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
या कार्यक्रमांना उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, उद्योजक दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके यांसह देवस्थानचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्याही विविध धार्मिक विधींनी उत्सवाची सांगता होणार आहे





