नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने कोसळल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले, जेथे सराव सुरू होता. या घटनेबाबत संरक्षणमंत्र्यांनी हवाई दल प्रमुखांशी चर्चा केली आहे.
माहिती देताना मुरैनाचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. तसेच या अपघातातून दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले. अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे.
दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की आणखी काही कारणामुळे अपघात झाला याची चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.
दुसरीकडे, प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. यात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही.