Madhya Pradesh : मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेचाही प्रभाव ओसरला? केवळ ६६ जागांवर मानले समाधान

Madhya Pradesh – मध्य प्रदेशात ( Madhya Pradesh ) विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Assembly Election Results 2023 ) कॉंग्रेससाठी अत्यंत निराशाजनक आहे. गेल्या निवडणुकांच्या वेळी ११४ जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसला यावेळी केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी खरेतर वातावरण कॉंग्रेसला अनुकूल असेच होते. पक्ष सत्तारूढ होण्याची तयारी करत असतानाच पूर्णत: विपरित असा कौल आला आहे.
राहुल गांधी ( rahul gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) मध्य प्रदेशातून गेली होती. त्यावेळी राहुल यांचा बराच काळ राज्यात मुक्काम होता आणि त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले होते.
मध्य प्रदेशच्या २१ विधानसभा मतदारसंघातून ३८० किमीचा प्रवास राहुल यांनी तेंव्हा केला होता. त्यामुळे या मतदारसंघांवर आणि एकूणच पूर्ण राज्यावर यात्रेचा प्रभाव होता.
तथापि, रविवारी आलेला निकाल सगळ्यांनाच चकित करणारा ठरला.त्याहून चमत्कारिक बाब अशी की ज्या २१ विधानसभा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा गेली होती, त्यातील १७ मतदारसंघांत कॉंग्रेसचा पराभव झाला आहे.
इंदोरमधील सर्व ८ मतदारसंघ यात्रेच्या मार्गात होते. या सगळ्या जागा कॉंग्रेसने गमावल्या आहेत. २०१८ च्या निवडणुकीत या २१ जागांपैकी ७ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाली होती. त्यातल्याही तीन जागा यंदा त्यांनी गमावल्या.





