Congress MLA : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्यात आली आहे. 27 वर्षांपूर्वीच्या एफडी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावल्याने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने भारती यांना दोन कलमांखाली तीन वर्षे तर एका कलमाखाली दोन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. या प्रकरणात सहआरोपी माजी बँक लिपिक रघुवीर शरण प्रजापती यांनाही तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने भारती यांना जामीन मंजूर करत उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यानंतर कायद्यानुसार आमदारकी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली. विशेष म्हणजे, ही कारवाई करण्यासाठी रात्री १०:३० वाजता विधानसभा सचिवालय सुरू करण्यात आले आणि त्यानंतर तातडीने सदस्यता रद्द करण्याचा आदेश जारी करण्यात आला. या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. ही माहिती मिळताच पक्षाचे अनेक नेते विधानभवनात दाखल झाले. यावेळी विधानसभा प्रधान सचिव अरविंद शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. “भाजपच्या सांगण्यावरूनच सचिवालय रात्री उघडण्यात आले आणि आमदारकी रद्द करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, ही राजकीय सूडबुद्धीची कारवाई असल्याचा दावा करत काँग्रेस याला ठामपणे विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.