Congress Mla : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विजयपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार मुकेश मल्होत्रा यांची आमदारकी ग्वाल्हेर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केली आहे. न्यायालयाने केवळ त्यांची निवडणूक अवैध ठरवली नाही, तर याचिका दाखल करणारे भाजप नेते राम निवास रावत यांनाच त्या मतदारसंघाचे नवे आमदार घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री राम निवास रावत यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी असा आरोप केला होता की, मुकेश मल्होत्रा यांनी पोटनिवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रात त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवली होती. रावत यांनी न्यायालयात सांगितले की, मल्होत्रा यांच्या विरोधात सहा गुन्हेगारी प्रकरणे दाखल असूनही त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला नव्हता. या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती जी. एस. अहलुवालिया यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला. प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती लपवणे हे निवडणूक कायद्याचे उल्लंघन असल्याचे नमूद करत न्यायालयाने मुकेश मल्होत्रा यांची निवडणूक अवैध घोषित केली आणि राम निवास रावत यांना आमदार म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले. नेमकं प्रकरण काय? राम निवास रावत यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मोहन यादव यांच्या सरकारमध्ये त्यांना थेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या घडामोडीनंतर विजयपूर मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत राम निवास रावत यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पराभवानंतर त्यांनी काँग्रेस उमेदवार मुकेश मल्होत्रा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू होती आणि आता न्यायालयाने त्यावर अंतिम निर्णय दिला आहे. मुकेश मल्होत्रा हे या भागातील प्रमुख आदिवासी नेते म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी भाजप सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले होते. २०२३ च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि सुमारे ४५ हजार मते मिळवली होती. त्यानंतर मे २०२४ मध्ये प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.