Madhuri Misal – शहरातील अतिक्रमणांवर, बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करा, असे आदेश नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ राज्यमंत्री आमदार माधुरी मिसाळ यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना दिले. मंत्री मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुणे महापालिकेच्या विकास प्रकल्पांचा आढावा बैठक झाली. अतिक्रमणांबाबत त्यांनी आयुक्तांना कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर तासाभरातच कलाग्रामच्या मागे असलेल्या अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई करून ते हटवले. या बैठकीला महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, आरपीआय आठवले गटाच्या पक्षनेत्या हिमाली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महापालिकेतील पक्षनेते सोपान चव्हाण, शिवसेना उ.बा.ठा.चे पक्षनेते नितीन गावडे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त, खातेप्रमुख उपस्थित होते. मिसाळ यांनी शहरातील अतिक्रमणांचा आणि बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले. याशिवाय होर्डिंग्ज पाॅलिसी तयार करा, प्रायोगिक तत्त्वावर सिंहगड रस्त्यावर महापालिकेने स्वत: डिजिटल होर्डिंग्ज लावून उत्पन्नाचा एक स्त्रोत निर्माण करावा, अशा सूचनाही केल्या. सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत त्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. बैठकीनंतर एका तासातच कलाग्रामच्या मागे असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने त्वरित कारवाई केली. याशिवाय या बैठकीत मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, अमृत योजना, समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा, मलनिःसारण प्रकल्प, पाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आणि श्रम साफल्य योजना, पाणीपुरवठा योजना, मान्सूनपूर्व कामे, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, घनकचरा व्यवस्थापन तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील नागरी सुविधा आणि शाळा, रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि दर्जा सुधारणा या विषयांवर चर्चा करण्यात आली.