Madhuri Misal: मुलांवर वाचनाचे संस्कार पालकांनीच रुजवावेत – माधुरी मिसाळ
Madhuri Misal:

पुणे पुस्तक महोत्सवाच्या मंडप उभारणीला प्रारंभ
Madhuri Misal: फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर १२ ते २० डिसेंबरदरम्यान रंगणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या मंडप उभारणीला शनिवारी प्रारंभ झाला.
मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्याची प्राथमिक जबाबदारी पालकांची असून, घरच्या वातावरणातूनच पुढच्या पिढीकडे वाचनाचा समृद्ध वारसा सोपवता येतो, असे मत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या वेळी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे होणाऱ्या महोत्सवाच्या उभारणीचे भूमिपूजन मिसाळ यांच्या हस्ते पार पडले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, लोकमान्य मल्टिपर्पजचे सुशील जाधव, मुख्य संयोजक राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर आणि प्रसेनजीत फडणवीस या वेळी उपस्थित होते.
पुस्तके माणसाचे ज्ञान आणि आकलन वाढवतात, तसेच एखादे पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचण्याची ओढ लागते, असा स्वतःचा अनुभव मिसाळ यांनी सांगितला. महोत्सवामुळे वाचन चळवळीला नवे बळ मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, महोत्सवाची व्याप्ती दरवर्षी विस्तारत असून, यंदा तब्बल २०० दालने प्रतीक्षायादीवर आहेत, अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली. लिट फेस्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध विषयांवरील २४ सत्रांच्या माध्यमातून पुणेकरांचा हा उपक्रम आता राष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





