Madhurani Prabhulkar : “कुणी गांभीर्याने बघत नाहीये…”; मधुराणी प्रभुलकरची कुलाबा किल्ल्याबद्दल खंत, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत !

Madhurani Prabhulkar । kulaba killa : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका बनली होती. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला होता. या मालिकेमुळे यातील कलाकरांना एक खास ओळख मिळाली आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री ‘मधुराणी प्रभुलकर’ घराघरात पोहोचली आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
सोशल मीडियावर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पण, काही दिवसांपूर्वीच या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका बंद झाली असून, डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2024 हा या मालिकेचा प्रवास होता.
दरम्यान, या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री ‘मधुराणी प्रभुलकर’ सध्या वीकेंड एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच तिने अलिबागमधील कुलाबा किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंतदेखील व्यक्त केली. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट चर्चेत आली असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.
मधुराणी आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, “अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते तेव्हा तिथल्या किनाऱ्यावरच्या ‘कुलाबा किल्ल्याला’ भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले. किती काय काय आहे तिथे… दगडी भक्कम तटबंदी, त्या काळातल्या तोफा, उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर, भवानी माता मंदिर, समुद्रात बांधलेल्या हया किल्ल्याच्या मधोमध असणारी गोड्या पाण्याची विहीर…
मला अजून माहिती हवी होती ह्या किल्ल्याबद्धल पण ती देऊ शकणारा गाईड सुद्धा तिथे नव्हता. खंत वाटली. किती अप्रतीम महत्वाची ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत आपल्या महाराष्ट्रात पण ह्या कडे का कुणी गांभीर्याने बघत नाहीये? असं ती म्हणाली.
View this post on Instagram
अभिनेत्री पुढे म्हणाली, गूगलवर जी माहिती मिळाली ती इथे देतेय… तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’
प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. या आशयाची पोस्ट तिने केली आहे.





