नवी दिल्ली – आधुनिक काळात सोशल मीडिया हा सर्वांचा मित्र झाला आहे. मित्राकडे जशी आपण एखादी मदत मागतो तसेच सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर मदत मागण्यासाठी केला जातो. पण या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारी मदत ही अनेक वेळा प्राणघातक ठरू शकते. वेदनेने ग्रस्त असलेल्या एका माणसाने यू ट्यूब वरील एक व्हिडिओ पाहून एक ज्यूस प्राशन केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली (Made milky juice after watching youtube video, youth dies after drinking juice) असून सोशल मीडियावरील उपाय घातक ठरू शकतात हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
युट्युब वर प्रसारित होणारे व्हिडिओ किंवा सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा केवळ वापरच केला जातो असा नाही तर ती माहिती अनेकांना फॉरवर्डही केली जाते ज्याचा उपयोग अनेक लोक करत असतात. पण डॉक्टरी सल्ल्याशिवाय जर अशा प्रकारचे उपाय योजले तर ते प्राण घातक ठरू शकतात असा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.
वरील प्रकरणातील तरुण आजाराने ग्रस्त असताना त्याने या संदर्भात व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये त्याला जर जंगली दुधी भोपळ्याचा ज्यूस पिलास तर तुला बरं वाटेल अशा प्रकारचा सल्ला कोणीतरी दिला आणि त्या प्रकारचा व्हिडिओ सुद्धा फॉरवर्ड केला. त्या व्हिडिओवर विश्वास ठेवून या व्यक्तीने जंगलात जाऊन तो दुधी भोपळा आणला आणि त्याचा ज्यूस त्याने प्राशन केला तो ज्यूस विषारी ठरल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्या एका घटनेत 11 वर्षाचा एक विद्यार्थी शाळेच्या दप्तराच्या ओझ्यामुळे पाठ दुखीने हैराण होता त्याने यावर उपाय शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आसरा घेतला. तेव्हा त्याला काही योगासने सांगण्यात आली. ती योगासने त्याने केली असता त्याचे पाठीचे दुखणे जास्तच बळवले. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्याला या दुखण्यातून बरे व्हावे लागले. मॅक्स हॉस्पिटलचे डायरेक्ट डॉक्टर राजीव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या सोशल मीडियावर मिळणाऱ्या ज्ञानामुळे फक्त रुग्णच परेशान आहेत असे नाही तर डॉक्टरांनाही त्याचा त्रास होत आहे. मिळणाऱ्या या उपायांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्ण करत असल्याने डॉक्टरांना सुद्धा त्रास होऊ लागला आहे.
एवढेच नव्हे तर डॉक्टर तपासणी करत असताना त्याला एखादा सल्ला देत असतील तर रुग्ण आपले सोशल मीडियावरील ज्ञान डॉक्टरांना सांगू लागले आहेत. रुग्णांनी आपल्या आजाराविषयीची माहिती या माध्यमातून निश्चितच मिळवायला हरकत नाही; पण या मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जे उपाय सांगितले जातात त्याचा अवलंब मात्र डॉक्टरी सल्ल्याशिवाय करू नये असा सल्ला आता वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.