-दत्तात्रय आंबुलकर
मदाथिलकथू अब्राहम जॉन्सन ही 50 वर्षीय केरळी व्यक्ती अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते. व्यवसायात वजनदार असणारे जॉन्सन यांचे शारीरिक वजन केवळ 20 किलो आहे. कारण ते शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आहेत. त्यांनी 1991 मध्ये स्थापन केलेल्या एमटेक इलेक्ट्रो डिजिटल इंडस्ट्रीजचे ते व्यवस्थापकीय संचालक असून राज्यातील एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. मुख्य म्हणजे हा लौकिक त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून मिळविला आहे.
लहानपणापासून पक्षाघाताने पछाडलेले जॉन्सन यांनी शिक्षणासाठी कधीही शाळेची वाट धरली नाही. कारण बालपणी ते घराबाहेर पडूच शकले नाहीत. त्यांची हालचाल पण आईच्या साहाय्याने होत असे. त्यांच्या आईने व्यावहारिक शिक्षणाच्या जोडीलाच आयुष्यात मोठी स्वप्ने पाहून स्वप्नांची पूर्तता करण्याची त्यांना लहानपणी शिकवण दिली. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन- प्रोत्साहन दिले व त्याचा फायदा जॉन्सन यांना पुढील आयुष्यात झाला. वाढत्या वयासोबत त्यांना जीवनात काही मोठे करावे असे सारखे वाटायचे. मात्र, त्यासाठी मोठी अडचण होती ती त्यांच्या दिव्यांगाची. त्यावर उपाय म्हणून त्यांनी आपले वाचन लिखाणापुरते शिक्षण घरीच पूर्ण केले. त्यांना वाचनाची आवड लागली.
याच वाचनवेडातून जॉन्सन यांनी इलेक्ट्रिक उपकरणांची दुरुस्ती विषयावरील एक सोप्या भाषेतील पुस्तक केवळ वाचलेच नाही तर त्या विषयाचा अभ्यासही केला. 1990 च्या दरम्यान केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित, अनियंत्रित स्वरूपात असल्याने गावातील शेती आणि घरातील विद्युत उपकरणांची दुरुस्ती वारंवार करावी लागे. त्यासाठी आवश्यक कौशल्य असणारे कारागीर उपलब्ध नसल्याने शेतकरी-गावकऱ्यांची मोठीच अडचण होत असल्याचे जॉन्सन यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याचे ठरविले.
केवळ वाचन आणि माहितीच्या आधारे विद्युत उपकरणांची निगा आणि दुरुस्तीच्या संदर्भात जुजबी माहिती मिळविलेल्या जॉन्सन यांनी आपले दिव्यांगत्व बाजूला सारून विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुरुवातीला त्यांना या कामात काही अडचणी आल्या. मात्र, त्यांनी आपले प्रयत्न व जिद्द सोडली नाही. घरबसल्या आपले काम सुरूच ठेवले. सुमारे 5 वर्षांनंतर जॉन्सन यांनी आपल्या प्रयत्नातून एक विद्युत स्टॅबिलायझर तयार केला. त्यांच्या या स्टॅबिलायझरला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मोठे विक्रेते त्यांच्याकडे स्टॅबिलायझरची नोंदणी करू लागले. त्यांच्या मालाला मागणी वाढत गेली. त्यांचा कारभार व व्यापही वाढत गेला.
दिव्यांग व औपचारिक शिक्षण घेऊ न शकलेल्या जॉन्सन यांनी माहिती व ज्ञानावर आधारित व्यवसायातून स्वावलंबन तर मिळवलेच त्याशिवाय आज त्यांचा विद्युत उपकरणांचा दुरुस्तीचा व्यवसाय व एलईडी इक्विपमेंट उद्योगात त्यांनी 50 जणांना रोजगार देण्याचे अनुकरणीय काम करून दाखविले आहे.