Lung Transplant – ठाणे येथून दात्याचे फुफ्फुस ग्रीन कॉरिडॉर अवघ्या दोन तास २५ मिनिटांत पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. डॉक्टर, पोलिस आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट समन्वयामुळे रुग्णालयात ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडले असून एका गंभीर रुग्णाला नवजीवनाची संधी मिळाली आहे. १२ मार्च रोजी काटेकोर नियोजन करून ठाणे येथील किम्स हॉस्पिटलमधून दात्याचे फुफ्फुस पुण्यात आणण्यात आले. डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पथक सकाळी १०.१५ वाजता ठाण्यातून निघाले आणि अवघ्या दोन तास २५ मिनिटांत म्हणजे दुपारी १२.४० वाजता डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. वेळेशी सुरू असलेल्या शर्यतीत मिळालेल्या या यशामुळे गंभीर रुग्णावर फुफ्फुस प्रत्यारोपण करणे शक्य झाले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे चेकुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममुळे अशा जटिल अवयवप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडता येत आहेत. डॉक्टरांच्या समर्पित कार्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी अवयवदानाबाबत समाजात अधिक जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. अवयवदानातून अनेकांचे जीव वाचू शकतात, असा संदेश समाजापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या मोहिमेसाठी ठाणे आणि पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पोलिस विभागाच्या समन्वयातून विशेष ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप चव्हाण, राहुल जाधव, हेमांगिनी पाटील आणि रोहित कटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली. संपूर्ण मोहिमेत पोलीस कर्मचारी, वैद्यकीय पथक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परता दाखवत फुफ्फुसांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित केली. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीममध्ये डॉ. आशिष डोळस, डॉ. राहुल केद्रे, ओटी नर्स वाल्मिक, परफ्युजनिस्ट निखिल लाकी, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर अरुण आणि तंत्रज्ञ विशाल पाटील यांचा समावेश होता. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही जीवनदायी मोहीम यशस्वी ठरली.