Pune : पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडॉरची अधिसूचना नव्याने जारी

पुणे : पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना राज्य सरकारकडून काढण्यात आली आहे. पुणे-नाशिक ग्रीन कॅरिडोअरमुळे या दोन्ही शहरातील अंतर कमी होणार आहे. पुण्यातून नाशिक येथे जाण्यासाठी सध्या पाच ते सहा तासांचे वेळ लागतो. तो या प्रकल्पामुळे दोन ते अडीच तासांवर येणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे.
पुणे- नाशिक औद्योगिक महामार्गासाठी एमएसआरडीसीने निविदा प्रक्रिया राबवून सल्लागाराची नियुक्ती देखील केली होती. या सल्लागार कंपनीकडून सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. परंतु मध्यंतरी शेतकऱ्यांनी प्रकल्पास विरोध दर्शविला होता.
त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत आले होते. गेल्या वर्षी पुन्हा या रस्त्याच्या भूसंपादनाबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढली. तरी देखील कामास सुरूवात न झाल्यामुळे या अधिसूचनेची मुदत संपुष्टात आली. आता नव्याने या संदर्भातील अधिसूचना राज्य सरकारकडून नुकतीच काढण्यात आली आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली.





