क्रिकेट काॅर्नर : मोहसीन बनतोय गुणवत्तेची खाण

आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात स्पर्धेतील नवा संघ असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने समिक्षकांनाही आपली दखल घ्यायला भाग पाडले. उत्तर प्रदेशमधील संभल या गावातून पुढे आलेला हा युवा गोलंदाज सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहेच, पण ती ओळखायला 2018 साली मुंबई इंडियन्सला अपयश आले. ही कसर लखनौ संघाने भरून काढली व मोहसीन सध्या स्पर्धा गाजवत आहे.
उत्तर प्रदेशकडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळत पुढे आलेल्या मोहसीनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत 4 गडी बाद करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यात त्याने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचा त्रिफळा ज्या चेंडूवर उडवला तो रिव्हर्स स्विंग चेंडू खुद्द समालोचकांनीही अनप्लेयेबल ठरवला. हाच मोहसीन गुणवत्तेची खाण ठरत आहे. मात्र, इथवर पोहोचण्यासाठी त्याने अफाट कष्ट केले आहेत. घरची परिस्थिती बेताची होती, तरीही त्याने आपले क्रिकेटवरील प्रेम जोपासले.
2018 साली झालेल्या लिलावात मुंबईने त्याला खरेदी केले होते. तो मुंबईकडे 2020 पर्यंत होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळवले गेले नाही. मात्र, यंदाच्या स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात त्याला त्याच्या बेसप्राईजवर 20 लाख रुपयांत लखनौने आपल्याकडे घेतले व त्याने यंदाच्या मोसमात लखनौकडून गुजरात जायंट्सविरुद्ध पदार्पण केले. पहिला सामना खेळतानाही त्याच्यात तो नवखेपणा अजिबात दिसला नाही. त्याने आजवर प्रथम दर्जाचे 17 सामने खेळताना 26 बळी मिळवले आहेत. तसेच 28 टी-20 सामने खेळताना त्याने 34 बळी घेतले आहेत. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याने दिल्लीविरुद्ध 16 धावांत 4 बळी घेत जाणकारांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याची फाइंड ही सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील आहे.
2018 साली झालेल्या या स्पर्धेत त्याने 8 सामने खेळताना 13 बळी मिळवले. आयपीएल कारकिर्दीत 4 सामन्यांत त्याने 8 बळींची नोंद केली. सातत्याने 140 किंवा त्यापेक्षाही जास्त वेगाने चेंडू टाकण्याची त्याची क्षमता अनेकांना मोहित करून गेली. मुंबईच्या ताफ्यात असताना एकदा त्याने आपले प्रशिक्षक बद्रुद्दीन यांना फोन करून हे मला खेळण्याची संधीच देत नाहीत, अशी तक्रार केली होती. मात्र, लसित मलिंगा व जहीर खान यांच्याकडून शिकून घे, असा सल्ला प्रशिक्षकांनी त्याला दिला व त्याने या दोन्ही गोलंदाजांकडून भन्नाट रिव्हर्स स्विंग शिकला तेच आता त्याचे प्रमुख अस्त्र ठरले आहे.
उमरान मलिक, आवेश खान, कुलदीप सेन, टी. नटराजन या एकापेक्षा एक सरस गोलंदाजांमध्ये आता मोहसनीचीही वर्णी लागत आहे. येत्या काळात ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी लवकरच भारताचा संभाव्य खेळाडूंचा संघ निवडला जाईल व त्यात मोहसीनचाही समावेश असेल असा विश्वास आहे. आता प्रत्यक्ष 16 खेळाडूंच्या संघात त्याला स्थान मिळेल का नाही हे आत्ताच सांगता येणार नाही; परंतु भविष्यातील भारतीय वेगवान गोलंदाजीचा तो देखील एक भारवाहक असेल यात शंका नाही.





