कौतुकास्पद! आधी 90 तास काम करण्याचा सल्ला, आता महिलांना देणार मासिक पाळीची सुट्टी, ‘या’ कंपनीने घेतला निर्णय

L&T Announces Menstrual Leave | लार्सन अँड टुब्रोचे (L&T) संचालक एसएन सुब्रमण्यन यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे 90 तास काम करायला हवे, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे सुब्रमण्यम यांच्यासोबत कंपनीवर देखील प्रचंड टीका झाली होती. मात्र, आता L&T ने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कंपनीने मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी (menstrual leave) देण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिलांना महिन्यातून एक दिवसाची पिरियड लीव्ह दिली जाणार आहे. याबाबतची घोषणा एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात केली. या निर्णयाचा फायदा कंपनीत काम करणाऱ्या शेकडो महिलांना मिळणार आहे.
मासिक पाळी दरम्यान महिलांना जास्त वेळ बसणे किंवा काम करणे कठीण जाते. त्यामुळे महिलांच्या सोयीसाठी लार्सन अँड टुब्रोने हा निर्णय घेतला आहे. या कंपनीत जवळपास 60,000 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये 5,000 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ही सुट्टी फक्त कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनियरिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिलांना मिळणार आहे. इतर विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली जाईल.
दरम्यान, एलअँडटीच्या आधी इतर कंपन्यांनीही या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने वर्ष 2020 मध्ये अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. याशिवाय, स्विगी, बायजू, एयू स्मॉल फायनान्स बँकसह इतर कंपन्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेत महिला कर्मचाऱ्यांना सुविधा प्रदान केली आहे.





