Stock Market: आखातातील युद्ध शमण्याच्या संकेतांमुळे जागतिक बाजारपेठेत आलेल्या सकारात्मक लाटेचा मोठा फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे. रामनवमीच्या सुटीपूर्वी बुधवारी झालेल्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार मुसंडी मारली. चौफेर खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज एकाच दिवसात तब्बल ८.२३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सेन्सेक्स ७५ हजारांच्या पार – सेंसेक्सच्या मंथली एक्सपायरीच्या दिवशी आज बाजार उघडल्यापासूनच तेजी दिसून आली. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स १,२०५ अंकांच्या (१.६३%) वाढीसह ७५,२७३.४५ वर, तर निफ्टी ३९४ अंकांच्या (१.७२%) उसळीसह २३,३०६.४५ वर स्थिरावला. विशेष म्हणजे, इंट्रा-डे व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ७५,८४९ आणि निफ्टीने २३,४६५ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. गुंतवणूकदारांची चांदी; मार्केट कॅप ४३१ लाख कोटींवर – मिडल इस्टमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणाव कमी होण्याच्या वृत्ताने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. २३ मार्च रोजी बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४,२२,७८,३१२ कोटी रुपये होते, ते आज वाढून ४,३१,०१,५७५ कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या दोन दिवसांतील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या दौलतीत एकूण १५,७९,९४५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बजाज फायनान्स, अल्ट्राटेकची सरशी – सेंसेक्समधील ३० पैकी २६ शेअर्स आज वधारले. यामध्ये प्रामुख्याने अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि टायटन या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, टीसीएस आणि बीईएल यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स मात्र घसरणीसह बंद झाले. बाजारातील घबराट मोजणारा ‘इंडिया VIX’ ६.८१ टक्क्यांनी घसरून २४.९१ वर आला असला, तरी तो अजूनही उच्च पातळीवरच आहे. बाजारातील आजची स्थिती: दरम्यान आज सेन्सेक्समध्ये २,९५९ शेअर्समध्ये वाढ झाली. १,३५७ शेअर्स घसरले. १५६ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. ६७ शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर तर १४ शेअर्सला लोअर सर्किट लागले होते. टिप: उद्या रामनवमीनिमित्त शेअर बाजारात व्यवहार बंद राहणार आहेत. आखातातील शांततेच्या प्रयत्नांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यास शुक्रवारच्या सत्रातही बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.