LPG Gas Cylinder Shortage : “युद्धजन्य परिस्थितीत भारतात खोटा प्रचार करुन राजकारण करणे हे देशविरोधी आहे”; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना खोचक टोला
आम्ही देशासोबत आहोत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांना दिले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

LPG Gas Cylinder Shortage – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेत, इराण-इस्त्राईल युद्ध, देशांतर्गत परिस्थिती आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे.
युद्धजन्य परिस्थितीत एनडीएचा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेचा पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठिंबा आहे, आम्ही देशासोबत आहोत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांना दिले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीत भारतात खोटा प्रचार करुन राजकारण करणे हे अत्यंत दुर्देवी आणि देशविरोधी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. पाकिस्तानमध्ये हेडलाईन्स होण्यासाठी काहीजण बोलतात, असा टोला त्यांनी गांधी यांना लगावला.
यावेळी शिंदे यांनी युद्धामुळे कुवेत, दुबई, मस्कत या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा मुंबई, पुणे येथे सुखरुप आणल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. राज्यातील विकास कामे आणि विविध प्रश्नांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याची शिंदे यांनी यावेळी माहिती दिली.
युद्धजन्य परिस्थितीचा विरोधक राजकारणासाठी वापर करत आहेत, हे दुर्देवी आहे. देशात गॅस टंचाई असल्याच्या अफवा काँग्रेस आणि ठाकरेसेना पसरवत आहेत. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना संधी मिळत आहे. राजकारणासाठी इतर विषय आहेत, मात्र युद्धजन्य परिस्थितीत देशासोबत राहणे अपेक्षित असताना विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली.
राज्यात कुठेही गॅस सिलिंडरची टंचाई नाही. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्तकपणे काम करत आहे, असे शिंदे म्हणाले. पंतप्रधानांसोबतच्या भेटीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि रवींद्र वायकर हे उपस्थित होते.






