‘love of tourism’: पत्नीला जग दाखवणाऱ्या केरळमधील ‘त्या’ चहा विक्रेत्याचा मृत्यू; आनंद महिंद्रांनीही केली होती मदत

तिरुअनंतपूरम : जगातील विविध देशांना पत्नीसह भेट देणाऱ्या केरळमधील एका सर्वसामान्य चहा विक्रेत्याचा वयाच्या ८४ व्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या 14 वर्षांत या जोडप्याने 26 देशांना भेट दिली होती.प्रवासाच्या आवडीमुळे अगदी कर्ज घेऊन त्यांनी जगभ्रमंती केली होती. त्यांच्या या आवडीने आनंद महेंद्रादेखील प्रभावित झाले होते.
एर्नाकुलम येथील चहाविक्रेते विजयन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र या परिस्थितीतही त्यांनी आपला छंद आवड झोपासली. प्रसंगी कर्ज काढून पत्नीसह जगातील विविध देशांना भेट देत होते. त्यांची पर्यटनाची आवड पाहून अनेकांनी त्यांना मदतही केली. उद्योगपती आनंद महिंद्रा सारखे प्रायोजक मिळू लागले.
2019 मध्ये सोशल मीडियावरून त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यावर महिंद्रा यांनी त्यांची ऑस्ट्रेलियाची भेट प्रायोजित केली होती. रशियाचा शेवटचा प्रवास 21 ऑक्टोबर रोजी होता आणि ते 28 ऑक्टोबर रोजी परतले होते.
प्रसिध्द लेखक एन. एस. माधवन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “विजयन यांच्याशी आठवड्यातून किमान दोन वेळा भेट व्हायची. त्यांच्याकडून प्रवासाच्या कथा ऐकणे एक आनंद होता. ते नुकतेच रशियाहून परतले होते. त्यांना पुतीन यांना भेटण्याची इच्छा होती.”





