हरवत चाललेली नाती

ऐ, तू येणार आहेस ना गं मावशीकडे मे महिन्यात रहायला? कोणत्या तारखेला जाणार आहेस?, मी तर येणारच आहे पण ओम, केदार, निकिताला पण विचार ना! आणि हो तू येताना व्यापार पण घेऊन ये खेळायला आणि तू ल्युडो. हे असे संवाद असायचे आमचे. मे महिन्यात भावंडांचे मावशीकडे रहायला जायच्या आधी. मावशी म्हणजे आपल्या आईचेच प्रतिरूप. जिव्हाळ्याची प्रेमाची.

माझी मावशी बदलापूरला रहायची. तिचा ना मोठा बंगला होता आणि अजूनही आहे आणि मोठ्ठी बाग, ज्यात अगदी आंबा, पेरू, चिकू, फणस ते पांढऱ्या तिखट मिरच्यांच्या झाडापर्यंत सगळ्या प्रकारची झाडे आहेत. आम्ही जवळजवळ आठ दहा मावस-मामे भावंडं मे महिन्यात आठ ते दहा दिवस हक्काने आवर्जून मावशीकडे रहायला जायचो. धम्माल आणि नुसती धम्माल करायचो. पेरूच्या झाडावर चढून बस बस खेळायचो, तुतीच्या झाडावरच्या झाडून सगळ्या तुती अगदी हात लाल रंगाने माखेपर्यंत खायचो. नदीवर जाणे, तिथे भेळ करून खाणे ह्या सगळ्यात एक वेगळीच मज्जा असायची.

माझे काका, आत्या, दुसरी मावशी, मामा हे सगळे नातेवाईकसुद्धा अगदी एकाच गावात जवळजवळच राहायचो. उरलेला मे महिना मग ह्यांच्या घरी सकाळ, दुपार, संध्याकाळ अक्षरशः पडीक असायचो. पत्ते, व्यापार, ल्युडो, पाटावरचा खेळ, गोष्टीची पुस्तकं वाचणे हे दुपारी आणि संध्याकाळी डबाइसपईस, भोकंजा, खांब खांब खांबोळी असे खेळ अगदी आईची जोरात हाक ऐकू येईपर्यंत खेळायचो.

दिवाळीत आम्ही सगळे नातेवाईक तेव्हा एकत्र यायचो. माझी आज्जी होती तेव्हा ती प्रत्येकाला तिच्या उशीखालून कोरी करकरीत पाच रुपायची नोट काढून प्रत्येकाला आशीर्वादासोबत द्यायची. आम्हाला त्या नोटेचं फार अप्रूप वाटायचं. ती आम्ही मुलं जपून ठेवायचो.

ती गेली तरीही आम्ही एकत्र येणे नाही सोडलं. सण-समारंभ ह्यात नातेवाईक असतील सामील तरच मज्जा, नाही का? रक्षाबंधनाला तर माझी आई तिच्या मावस, चुलत, मामे अगदी चुलत चुलत भावांना राखी बांधायला जायची ना, तर मला घेऊन जायची सोबत. इतकी नाती, इतके नाते संबंध होते पूर्वी जे प्रेमाने, निगुतीने जपले गेले आणि अगदी आमच्या पिढीपर्यंत आम्ही प्रेमाने जपत आहोत. पण आजकाल कुटुंब एकतर लहान झालंय आणि त्यात कोणाला कोणाकडे जायलाही वेळ नसतो.

एकच मुलगी किंवा मुलगा असला की त्यांना पुढे मामा, काका, आत्या अशी नातीच नसतात. चुलत वगैरे तर दूरच राहिले पण सख्खी नाती सुद्धा हल्ली कुठे जपली जात आहेत म्हणा? अभ्यास झाला की मुलांना अदर एक्‍स्ट्रा ऍक्‍टिव्हिटीच्या नावाखाली उगाचच ह्या नात्यांपासून, खेळापासून वंचित ठेवण्यात आई वडिलांचीच खरंतर चूक असते.

मावशीकडे जायचे असले की आम्ही किती आनंदी, उत्साही असायचो. सगळी भावंडं भेटणार, मावशीच्या हातची खाराची मिरची, लसूण चटणी खायला मिळणार ह्यातही वेगळाच आनंद असायचा. कोणाचीही आई सोबत नसली तरी आम्ही एकेकटे रहायचो. मावशी अगदी सगळ्यांवर आपल्या मुलांसारखेच प्रेम करायची. तिच्याशी आणि काकांशी गप्पा, संध्याकाळी शुभंकरोती, एकत्र रामरक्षा ह्यात एक वेगळीच मज्जा असायची.

एकाच बिल्डिंगमध्ये राहात असलेल्या काकुकडे तर मी हक्काने कधीही जायचे. मग जेवायची वेळ आहे, झोपायची वेळ आहे आहे असे बंधन कधीच नसायचे तिच्याकडे जाताना. मोकळेपणा असायचा सगळ्यांच्याच वागण्यात. आपलं घर तसच काकूचं घर असं वाटायचं.

प्रेम असेल, आपुलकीही असेल आत्ताच्या नात्यांत, म्हणजे जी काही तुटपुंजी नाती आहेत त्यात, पण एकमेकांच्या घरी जाणंयेणं, संवाद, एकत्र येऊन गप्पा, मजा हे हरवलं आहे. आजकाल मुलांना सुट्टी लागली की सगळेच कुठेकुठे ट्रीपला जातात. पण मावशीकडे, आत्याकडे, मामाकडे आठ दिवस रहायला जाणे हा प्रकार मी आजकाल लोप पावलेला बघत आहे. ह्यात व्यस्तता, अभ्यास ही मुलांची कारणे आणि आई बाबा दोघांच्या नोकऱ्या हे जरी कारणीभूत असले तरीही जी काही नाती आहेत ती जपली पाहिजेत. आजकाल फोन, व्हिडिओ कॉलिंग ह्या मुळे एकमेकांना बघता येते, बोलता येते, पण सहवास नाही मिळत एकमेकांचा, जो खूप सुंदर असतो नात्यात, एकमेकांना समजून घेण्यात.
काहीतरी हरवायच्या आधी जपलं पाहिजे प्रेमाने आपुलकीने…

– मानसी चापेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)