ओझर: मुंबईसह महाराष्ट्रातील समस्त मराठी माणूस गट विसरून गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या, जे दिल्लीत बसले त्यांच्या छाताडावर बसला, तर ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा ) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवार दि. २५ मे रोजी ओझर येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ते जुन्नर तालुक्यात आले होते. त्यावेळी ओझर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र कधी येतील या प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी शिवसेना नेते खा.संजय राऊत, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा नेते आदित्य शिरोडकर संपर्कप्रमुख दिलीप बामणे, दिपमाला बढे, मनोज पुंडे, शांताराम सावंत मयूर गुंजाळ उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे जाहीर केल्यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यासाठी दौरे चालू आहेत. लोकसभा, विधानसभा प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक म. वि.आघाडी एकत्रित मिळून लढण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. चार मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात छगन भुजबळ यांना मिळालेल्या मंत्रीपदावर बोलताना, “मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी स्विकारले आहे, त्यांचा कुठलाही पक्ष नाही अजित पवार यांनी चोरलेल्या पक्षात ते आहेत. भाजपशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने कितीही मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होणार, भाजप गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून एकापेक्षा जास्त म्हणजे चार मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात,” असाही टोला त्यांनी लगावला. सोनवणे हे पहिले आमच्या पक्षात होते. त्यानंतर… जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे जुन्नर तालुक्यातील बिबट प्रश्नाला घेऊन ‘तालुक्यात एकतर बिबट राहील, नाहीतर मी राहील’ असे जनतेला सांगून आमदार झाले. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत यांनी बिबट तर दिसत आहे. मात्र सोनवणे दिसतात कुठे, सोनवणे हे पहिले आमच्या पक्षात होते. त्यानंतर ते राज ठाकरेंच्या पक्षात गेले आणि आता ते अमित शहांच्या पक्षात आहेत, अशी मिश्किल टिप्पणी ही राऊत यांनी केली.