Loni Kalbhor Thar Accident : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार! भरधाव वेगात १७ दुचाकी उडवल्या; चालकाचं वय पाहून बसेल धक्का
Loni Kalbhor Thar Accident : महाराष्ट्र दिनाच्या सकाळी लोणी काळभोरमध्ये थरकाप; अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे थार चालवत पोलीस ठाण्याबाहेरील गाड्यांना उडवले.

Loni Kalbhor Thar Accident – महाराष्ट्र दिनाच्या सकाळी लोणी काळभोर थरारक अपघाताची घटना घडली असून अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात ‘थार’ गाडी चालवत नियंत्रण गमावल्याने पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या तब्बल १७ दुचाकींना जोरदार धडक देत मोठे नुकसान केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन मालक नवनाथ पंडित सातव (रा. तांबेवस्ती, केसनंद, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार संतोष तांदळे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी पहाटे नवनाथ सातव यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची ‘थार’ ही गाडी त्यांच्या नात्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला देण्यात आली होती. तो आपल्या तीन मित्रांसह तीर्थक्षेत्र रामदरा येथे दर्शनासाठी गेला होता.
दर्शन करून परतत असताना सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावातील दत्त मंदिर ते लोणी फाटा दरम्यान, पोलीस ठाण्यासमोर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेग आणि बेदरकार वाहनचालक यामुळे थार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर आदळली. धडकेत शासकीय व खासगी मिळून एकूण १७ दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
विशेष म्हणजे, चालक अल्पवयीन असून त्याच्याकडे वैध परवाना नसतानाही वाहन देण्यात आल्याने वाहन मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.





