Loni Kalbhor News : नदीपात्रातील कचऱ्याचा प्रश्न पेटला! ७ दिवसांची मुदत संपली, एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा छेडलं आंदोलन
Loni Kalbhor News : २६ फेब्रुवारीच्या भीषण आगीनंतरही प्रशासनाला जाग नाही? मुळा-मुठा नदीचे अस्तित्व वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका.

Loni Kalbhor News – लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती व परिसरातील काही गावांकडून मुळा-मुठा नदीपात्रात टाकल्या जाणार्या कचर्याविरोधात एमआयटी एडीटी विद्यापीठातील सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांनी पुन्हा ‘कचरा बंद’ आंदोलन सुरू केले आहे. सात दिवसांची मुदत संपल्यानंतरही नदीत कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र भूमिका घेत आंदोलन छेडले आहे.
विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत कचरा वाहून नेणार्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतींना कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार थांबलेला नाही.
पर्यायी जागेची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन तीव्र करत कचर्याच्या गाड्या प्रवेशद्वारावरच अडवण्याचा निर्णय घेतला आहे. नदीपात्रात कचरा टाकणे पूर्णपणे बंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, 26 फेब्रुवारी 2026 रोजी नदीपात्रात टाकलेल्या कचर्याला भीषण आग लागली होती.
ही आग सलग चार दिवस धुमसत राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या घटनेनंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते तसेच ग्रामपंचायतींचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. मात्र या गंभीर प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
दररोज सुमारे 70 टन कचरा थेट मुळा-मुठा नदीपात्रात टाकला जात आहे. कचर्याची दुर्गंधी, वारंवार लागणार्या आगी आणि विषारी धुरामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सात दिवसांची मुदत संपल्यानंतर आम्ही पुन्हा कचरा नदीत टाकण्यास विरोध केला आहे.
-मुग्धा सोनवणे, विद्यार्थिनी
एमआयटी एडीटी विद्यापीठाने नेहमीच स्थानिक ग्रामपंचायतींना सहकार्य केले आहे. मात्र नदीपात्रात कचरा टाकणे चुकीचे असून त्यामुळे जल व वायू प्रदूषण वाढत आहे. मुळा-मुठा नदीचे अस्तित्व, विद्यार्थ्यांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी सामंजस्याची भूमिका घेत पर्यायी जागेवर तातडीने कचर्याची विल्हेवाट लावावी, अशी विनंती आहे.
-प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्याध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ





