MIT ADT University: एमआयटी एडीटी विद्यापीठाचा डंका; लष्करी सन्मानाचा ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार पटकावला

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर – डिफेन्स फोर्स लीग आणि डीआयएफटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘डिव्हाईन एव्हिएशन एज्युकेशन अँड कल्चर समिट’मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, दूरदृष्टीपूर्ण व राष्ट्रउभारणीस हातभार लावणार्या कार्याबद्दल एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाला डीएफएलचा प्रतिष्ठेचा ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान विद्यापीठाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी स्वीकारला.ही परिषद ‘आपल्या सैन्याला समजावून घ्या’ या संकल्पनेवर आधारित असून भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथांना समर्पित ‘वॉल ऑफ हिरोज’ या जागतिक विक्रमी मोहिमेच्या अधिकृत शुभारंभासाठी आयोजित करण्यात आली होती. परिषदेचे उद्घाटन माजी हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते झाले.
तसेच अरुणाचल प्रदेश व मिझोरामचे राज्यपाल तसेच इंडियन एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष एअर मार्शल शशीकुमार रामदास यांचे विशेष मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. या प्रसंगी नागरी विमान वाहतूक उपमहासंचालिका सुवरिता सक्सेना, मिग-21 विमानावर सर्वाधिक उड्डाण तासांचा जागतिक विक्रम करणारे एअर कमोडोर सुरेंद्र त्यागी (वायुसेना पदक), तसेच भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते व पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्यासह संरक्षण, शिक्षण,
विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ज्ञ उपस्थित होते. उच्च शिक्षणात नवोन्मेष, कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन व उद्योगस्नेही उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या योगदानाची दखल घेत डीएफएलतर्फे एमआयटी एडीटी विद्यापीठाला हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकार करण्याची विद्यापीठाची भूमिका प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
परिषदेस प्रारंभी 1971 च्या युद्धातील शहीदांसह भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले यांना एनसीसी कॅडेट्सकडून विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. याच मंचावर डीएफएल व डीआयएफटी फाऊंडेशनतर्फे ‘वॉल ऑफ हिरोज’ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड (संस्थापक अध्यक्ष) व प्रा. डॉ. मंगेश कराड (कार्याध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठाला मिळालेला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार हा विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था, सामाजिक बांधिलकी आणि देशहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




