Lonavala: जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास आराखड्याला गती देण्यात आली आहे. या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत विविध विकासकामांवर चर्चा करून नियोजन निश्चित करण्यात आले. मुंबई-पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोणावळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा या आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी शहरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सीसीटीव्ही यंत्रणा उभारून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात येणार आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, जंक्शन सुधारणा, प्रशस्त पदपथ, भूमिगत विद्युत वाहिन्या आणि आधुनिक पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून ट्रॅफिक व्यवस्थापन सुधारणा, नवीन पार्किंग झोन आणि हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात येणार आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि अतिक्रमण नियंत्रण या मूलभूत प्रश्नांवरही विशेष भर देण्यात येणार आहे .२०२७ मध्ये होणाऱ्या पुणे ग्रँड टूर सायकल रेस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग मावळ तालुक्यातून जाणार असल्याने या पार्श्वभूमीवर लोणावळ्याचा विकास अधिक वेगाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. Voter List : …तर मतदार यादीतून नाव वगळणार; विशेष मतदार यादी सखोल पुनरिक्षण प्रक्रिया