Lonari Samaj Morcha: जेजुरीत लोणारी समाज आक्रमक! २३ एकर जागेचा वाद पेटला; रवींद्र धंगेकरांचा मोठा इशारा
Lonari Samaj Morcha: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जेजुरीत लोणारी समाजाचा भव्य मोर्चा; येत्या २ वर्षात भाविकांसाठी भव्य धर्मशाळा उभारण्याचा निर्धार.

Lonari Samaj Morcha – मागील पिढी दानशूर होती, राज्याच्या विविध भागात या दानशूर व्यक्तींनी जागा दान केल्यामुळे लोणारी समाजाची मालमत्ता निर्माण झाली. जेजुरीतील २३ एकर जागा आणि मुख्य चौकात असलेली धर्मशाळेची जागा ही लोणारी समाजाची मालमत्ता आहे. विश्वस्तांनी मनमानी कारभार केला आहे, समाज त्यांच्या चुकीला माफ करणार नाही. या जागेत लोणारी भाविकांसाठी येत्या दोन वर्षात धर्मशाळा उभी राहील, असे प्रतिपादन माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
तिर्थक्षेत्र जेजुरी नगरीत राधाबाई बाबाजी नरळे लोणारी ट्रस्टची २३ एकर जागा असून ही जागा विकण्याच्या घाट ट्रस्टच्या विश्वस्तांनी सुरू केला असल्याचा आरोप आहे. तसेच, जेजुरी शहरातील अखिल भारतीय लोणारी धर्मशाळा असून या ट्रस्टच्या विश्वस्तांनी मनमानी करून गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. या विरोधात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जेजुरीत लोणारी समाज बांधवांनी मोर्चा काढून सभेचे आयोजन केले होते.
राधाबाई नरळे लोणारी ट्रस्टच्या जागेपासून ते जेजुरी शहरातील लोणारी धर्मशाळेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोणारी समाज उपस्थित होता. यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, जेजुरीतील दोन्ही जागा या समाजाच्या मालकीच्या आहेत, मनमानी करणाऱ्या जुन्या विश्वस्तांची खोटी प्रतिष्ठा जास्त दिवस टिकू शकणार नाही, जेव्हा समाज रस्त्यावर येतो, तेव्हा चुकीचे वागणाऱ्यांना जागा दाखवतो.
असे सांगून जेजुरीतील धर्मशाळा उभारण्यासाठी २१ लाख रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी समस्त लोणारी समाजाच्या वतीने दोन्ही ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला तात्काळ बरखास्त करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, नगरसेवक नवनाथ रानगट, गोरख शिंदे, तानाजी करचे, सातारा जिल्हा परीषदेचे माजी सभापती शिवाजीराव शिंदे, डाॅ. सुदर्शन घेडगे, नर्मदाताई खाडे यांची मनोगते झाली.





