Lok Sabha Result 2024 (Maval) : मावळात शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंची विजयी हॅट्रिक, संजोग वाघेरे पराभूत…

Lok Sabha Result 2024 (Maval) : लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते थेट कोकणातील रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे. मावळ लोकसभेसाठी एकूण 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यातील मुख्य लढत ही दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये झाली.
यामध्ये शिवसेने शिंदे गटाचे श्रीरंग बारणे (SHRIRANG APPA CHANDU BARNE) यांनी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील (SANJOG BHIKU WAGHERE PATIL) यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. श्रीरंग बारणे हे 96 हजार 615 मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान, विजयानंतर श्रीरंग बारणे यांचे भाजप पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, सदाशिवजी खाडे ,नामदेव ढाके व पदाधिकाऱ्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.
मागील दोन लोकसभा निवडणूकीत काय झालं होते…?
साल 2014 लोकसभेच्या निवडणूकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत बारणे यांनी राष्ट्रवादी आणि शेकापच्या उमेदवाराला धूळ चारत विजय मिळवला होता. तर 2019 च्या निवडणुकीत तर श्रीरंग बारणे यांनी शरद पवारांचा नातू असलेल्या पार्थ पवार यांना धूळ चारली होती आणि विजय मिळवला होता.
Lok Sabha Result 2024 (Maval) : मतांची आकडेवारी….
1. श्रीरंग बारणे (शिवसेना, शिंदें गट) : 6 लाख 92 हजार 832
2. संजोग वाघेरे (शिवसेंना, ठाकरे गट) : 5 लाख 96 हजार 217
3. माधवीताई जोशी (वंचित बहुजन आघाडी) : 27 हजार 768
अन् संजोग वाघेरेंनी केला होता ठाकरे गटात प्रवेश …
दरम्यान, मित्र पक्ष भाजप, अजित पवार गटाच्या प्रबळ दाव्यानंतरही मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाला सुटला होता. त्यानंतर शिंदे गटाने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे यांना लोकसभेची निवडणूक खुणावत होती. मात्र, 2019 मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने त्यांना ही इच्छा मनातच ठेवावी लागली. त्यावेळी वाघेरे यांनी माघार घेतली होती. मात्र, यावेळी निवडणूक लढण्याचे निश्चित करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता.





