Lok Sabha Election 2024| देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच आता देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी आज अर्थात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आगामी लोकसभा दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. अखेर बुधवारी संध्याकाळी पहिल्या टप्प्यातील राज्यांचा निवडणूक प्रचार संपला आहे.
या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत अनेक लोकसभा मतदारसंघांना भेटी दिल्या आणि रॅलींना संबोधित केले आणि रोड शोमध्ये भाग घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे अनेक मंत्रिमंडळ सहकारी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांसारखे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि इतर पक्षांनीही त्यांच्या उमेदवारांचा प्रचार केला.
महाराष्ट्रातील पाच जागांवरआज मतदान Lok Sabha Election 2024|
महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर आज १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रशासनाकडून मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे.
19 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील 8 , राजस्थानमधील 13, मध्य प्रदेशातील 6, आसाममधील 5, बिहारमधील 4 , महाराष्ट्रातील 5 , जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 1, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी 2, त्रिपुरामध्ये 1 मतदान होणार आहे. उत्तराखंडमध्ये 5, तामिळनाडूमध्ये 39, पश्चिम बंगालमध्ये 3, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये प्रत्येकी 1 जागांवर मतदान होणार आहे.
हे मंत्री निवडणुकीच्या रिंगणात Lok Sabha Election 2024|
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातील नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील चंद्रपूरमधून निवडणूक लढणार आहे. तर अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपले नशीब आजमावत आहेत.
याशिवाय मोदी सरकारमधील मंत्री सर्बानंद सोनोवाल, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, संजीव बालियान, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, त्रिपुरा आणि नबाम तुकी, अरुणाचल प्रदेश यांच्या जागेवरही आज मतदान होणार आहे.
4 जून रोजी निकाल Lok Sabha Election 2024|
दरम्यान, 18 व्या लोकसभेच्या 543 सदस्यांची निवड करण्यासाठी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका भारतात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहेत. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
हे वाचलं का ? मतदानासाठी लांबच लांब रांगा, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत २१ राज्यांतील लोकसभेच्या १०२ जागांवर मतदान सुरु