Lok Sabha Election 2024 : जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं….

Lok Sabha Election 2024 – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून जागावाटपाबाबत दावे- प्रतिदावे केले जात आहेत. आघाड्यांमधील घटक पक्षांची यासंदर्भात बोलणीही सुरू झाली आहे.
राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तर अगोदरच २३ जागांवर दावा केला आहे. त्यावर अगोदर कॉंग्रेस पक्षाने प्रतिक्रिया दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही आता भाष्य केले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीत सोनिया गांधी, उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत जागांच्या संदर्भात बऱ्याच बाबी स्पष्ट झाल्या आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत तुमच्यापर्यंत सगळी माहिती येईल असे सूळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्याच्या राजकारणात महाआघाडी आणि महायुती असे दोन गट पडले आहेत. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे.
तर महाआघाडीत शरद पवार गट, उध्दव ठाकरे गट आणि कॉंग्रेस यांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही महाआघाडीत सहभागी होऊ शकते अशी चर्चा आहे. अर्थात त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
दरम्यान, येत्या एक- दोन दिवसांत आमच्यातील जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दिल्लीत तीन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे कॉंग्रेस पक्षाचीही अंतर्गत बैठक झाली आहे. आता पुन्हा तिन्ही पक्षांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि आठवडाभरात सगळेस्पष्ट होईल असे पाटील यांनी सांगितले.





