Lok Sabha Election 2024 । विदर्भातील लोकसभा मतदारसंघापैकी भंडारा गोंदिया मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. येथे भाजप पक्षाकडून सुनिल मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून डॉ प्रशांत पडोळे यांना तिकीट देण्यात आले आहे. अशात या दोन पक्षांच्या उमेदवारांतच लढत होणार असल्याचे चित्र जरी असले तरी बसपाने तेली समाजाच्या भाजप नेत्याला उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचे चित्र नाकारता येत नाही.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणे लक्षात घेतल्यास, या मतदारसंघात कुणबी समाजाचं वर्चस्व आहे. त्यापाठोपाठ तेली आणि पोवार समाजाची मतं आहेत. तसेच अनुसूचित जातीचाही मतदारवर्ग आहे. गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर कुणबी उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेला दिसतो. या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कुणबी, तसेच तेली उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
बहुजन समाजवादी पक्षानं तेली समाजाच्या संजय कुंभलकर यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन समाज पक्षाने दुसऱ्यांदा या मतदारसंघात तेली समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे.या समाजाची मते लक्षणीय(जवळपास 2.50-3 लाख) आहेत.ती मते कितपत बसपकडे वळविण्यात उमेदवार यशस्वी होते,आणि हत्तीची चाल कोणत्या दिशेने राहते, यावर या निवडणुकीतील विजयी होणाऱ्या उमेदवाराच्या मताधिकाच्या निकाल अवलंबून राहणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, बसपाच्या उमेदवारामुळे या मतदार संघात एकूणच काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे.
दरम्यान, भाजप उमेदवार सुनील मेंढे तर काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या उमेदवारीनंतर बहुजन समाज पार्टीने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संजय कुंभलकर यांना उमेदवारी देत निवडणुकीत ट्विस्ट आणला आहे.
हे वाचले का ? भंडारा – गोंदियात प्रफ्फुल पटेल वाढवणार भाजप उमेदवाराची ‘ताकद’