Lok sabha 2024: महाराष्ट्रातील 48 जागा जिंकण्यासाठी भाजपची युद्धपातळीवर तयारी सुरू

मुंबई – भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपने देशभरातील ५४३ जागांसाठी क्लस्टर रणनीती तयार केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी १२ क्लस्टर तयार करण्यात आले असून, एका क्लस्टर प्रमुखावर ४ मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणी भाजप नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा व अमित शहा यांच्या नेतृत्वात मंगळवारी दिल्लीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, राम सातपुते, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, रवींद्र चव्हाण या महाराष्ट्रातील नेत्यांची उपस्थिती होती. या नेत्यांच्या उपस्थितीत या बैठकीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील व्युहरचना आखण्यात आली. भाजपने लोकसभेच्या देशभरातील ५४३ जागांसाठी १५६ क्लस्टर प्रमुख नियुक्त केलेत. या प्रमुखांकडून या बैठकीत त्यांच्या मतदार संघांतील स्थितीचा आढावा घेण्यात आला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीतील आव्हान पाहता भाजपने एका क्लस्टर प्रमुखावर ४ जागांची जबाबदारी दिली आहे. विशेषतः त्यांना ३ ते ४ जागा जिंकून आणण्याचे टार्गेटही देण्यात आले आहे.
या बैठकीत अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकून आणण्याचे निर्देश दिलेत. भाजपने लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. पुढील ३० वर्षे केंद्रात भाजपची सत्ता राहील यासाठी प्रयत्न करा. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा देशभर उत्साहाने साजरा केला जाईल याची काळजी घ्या. केंद्रीय योजनांचा विस्तार करा. तसेच महिला बचत गट, बुथ स्तरावर अधिक लक्ष केंद्रीत करून मतदारांना भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले आहेत.
३ टर्म खासदार राहिलेल्यांना संधी नाही?
मतदार संघातून कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो हे पाहण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आलेत. याशिवाय बूथ व्यवस्थापन, जातीय समीकरण जुळवून आणण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग, आघाडी करणे, नेत्यांची वज्रमूठ बांधण्याची सूचनाही भाजप श्रेष्ठींनी आपल्या क्लस्टर प्रमुखांना केली आहे. विद्यमान खासदारांच्या गत ५ वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्याची कामगिरीही या प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. त्यातही ३ पेक्षा जास्तवेळा विजयी झालेल्या खासदारांच्या जागी यावेळी तरुण व नवा चेहरा देण्याची शक्यता पडताळून पाहण्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे.





