लॉकडाऊन कि निर्बंध शिथील: पुण्यात काय होणार?

पुणे – लॉकडाऊन कायम ठेवायचे, की निर्बंधांमध्ये सवलत देऊन दुकानांना परवानगी द्यायची, याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी (दि.28) होणाऱ्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदींसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.शहर व जिल्ह्यात दि. 10 फेब्रुवारीपासून करोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली. त्यानंतर मार्च महिन्यात करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत राहिली.
या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम आता दिसून येत असून करोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मदत झाली.या लॉकडाऊनची मुदत येत्या दि.31 मेपर्यंतच आहे. त्यानंतर प्रशासनाकडून नव्याने नियम लावले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर अन्य दुकाने उघडण्यास परवानगी तसेच दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. या सर्व मुद्द्यांवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
3-4 टप्प्यांत सूट – वडेट्टीवार
लॉकडाऊनमधून सूट देताना ती 3-4 टप्प्यांत दिली जाईल. रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी, असा विचार आहे.
तसेच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावो आणि शिथिलता द्यावी, असा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.




