Sangram Thopate | पुण्यातील भोर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी भोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. ज्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज संग्राम थोपटे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भोरमधील शिवतीर्थ चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संग्राम थोपटे कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना एक पात्र लिहिले आहे. घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. पत्रात नेमकं काय? पुण्यातील भोर तालुक्यात गेली ४० वर्षे वर्चस्व राखलेल्या थोपटे कुटुंबीयांच्या राजकारणाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घरघर लागली. संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. अखेर भविष्याची राजकीय दिशा व गरज ओळखून संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानुसार, मंगळवार, २२ एप्रिल रोजी प्रदेश भाजप कार्यालयात थोपटे यांचा मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होत आहे. तालुक्यातील गेली अनेक वर्षे काम करत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता बाहेरच्या लोकांना पक्षात घेतले जात आहे. ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला ते आता आपल्यासोबत येत आहेत. घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नेत्यांनी वरिष्ठांकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. नेत्यांच्या पायाशी लुडबूड करणारे लोक पुढे निघून जातात आणि हाडाचा कार्यकर्ता कायम दुर्लक्षित राहतो? हे असे का याचे उत्तर वरिष्ठांनी अवश्य द्यावे, असे या पत्रात म्हटले आहे.