अमरावती : घराणेशाहीच्या विरोधात सातत्याने भूमिका व्यक्त करणाऱ्या भाजपने नगरपालिकांच्या निवडणुकीत नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांची उमेदवार म्हणून निवड केल्याने त्यावर पक्षातच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपमधील ज्येष्ठ नेते अरविंद नळकांडे यांनी उघडपणे याविषयी नाराजी व्यक्त करीत भाजपच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. अरविंद नळकांडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंध नसलेल्या आणि केवळ भाजपमधीलच नव्हे तर काँग्रेससहित विविध राजकीय पक्षातील सच्च्या कार्यकर्त्यांची चमू उभारून त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरीत करण्याची आपली इच्छा सुस्पष्ट शब्दात व्यक्त केली होती. घराणेशाही आणि जातीयवादाचा राजकारणासाठी वापर गत अनेक वर्षांपासून भाजप, कांग्रेससहित साऱ्या पक्षात केल्या गेला आणि त्याचे दुष्परिणाम आज देश भोगतो आहे, असे ते म्हणाले. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्याव्या, भाजप नेत्यांनी त्यात लुडबुड करू नये, असे आवाहन केले होते, तेव्हा त्याचे स्वागत मोदी, देवेंद्र समर्थक या नात्याने मी केले होते. पण, सद्यस्थिती पाहता पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा विसरच ठिकठिकाणच्या भाजप नेत्यांना पडला आहे, हे स्पष्टपणे जाणवत आहे, अशी खंत अरविंद नळकांडे यांनी व्यक्त केली आहे.