मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपद तसेच थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल. मतदार यादी तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती यासारखी कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मात्र, लेखनिकांच्या चुका, मतदाराचा प्रभाग चुकणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे यासंदर्भात मतदार हरकती व सूचना दाखल करू शकतात. पहिली निवडणूक कोणती? राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती की जिल्हा परिषद यापैकी कोणती निवडणूक प्रथम होणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मनुष्यबळाचा विचार करून टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जातील. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर होणार नाही. व्हीव्हीपॅट का नाही? राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जात नाही. प्रभा पद्धतीमुळे एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यावे लागतात आणि त्यांच्या मतांची मोजणी करावी लागते. यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर शक्य होत नाही. केवळ एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो तेव्हाच व्हीव्हीपॅट वापरले जाते. व्हीव्हीपॅटचा वापर केल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक वेळकाढू होऊ शकते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या तयारीसाठी नागरिकांनी प्रभागनिहाय मतदार यादी तपासून हरकती व सूचना वेळेत दाखल कराव्यात, असे आवाहन आयोगाने केले आहे.