राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

LK Advani Bharat Ratna| देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आणि यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी (३० मार्च) राष्ट्रपती भवनात चार व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पी.व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ एमएस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात चारही व्यक्तींच्या कुटुंबीयांना हा सन्मान मिळाला. नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपतींकडून हा सन्मान स्वीकारला.
#WATCH | President Droupadi Murmu confers Bharat Ratna upon veteran BJP leader LK Advani at the latter’s residence in Delhi.
Prime Minister Narendra Modi, Vice President Jagdeep Dhankhar, former Vice President M. Venkaiah Naidu are also present on this occasion. pic.twitter.com/eYSPoTNSPL
— ANI (@ANI) March 31, 2024
केंद्राने यंदा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदींच्या कार्यकाळात मदन मोहन मालवीय, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना हा सन्मान मिळाला होता. 2024 च्या 5 व्यक्तींसह आतापर्यंत हा सन्मान मिळविणाऱ्यांची संख्या 53 होईल.
लालकृष्ण अडवाणींचा राजकीय प्रवास LK Advani Bharat Ratna|
फेब्रुवारी २०२४ मध्ये अडवाणींना भारतरत्न देण्याची घोषणा झाली तेव्हा त्यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची, पाकिस्तान येथे एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत स्थायिक झाले. येथे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांच्या पत्नीचे नाव कमला अडवाणी आहे. त्यांच्या मुलाचे नाव जयंत आडवाणी आणि मुलीचे नाव प्रतिभा आडवाणी आहे.
अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. याआधी ते १९९८ ते २००४ दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गृहमंत्री होते. भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. LK Advani Bharat Ratna|
दहाव्या आणि १४ व्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१५ मध्ये, त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. लालकृष्ण आडवाणी ५ वेळा लोकसभेतून आणि ४ वेळा राज्यसभेतून खासदार राहिले आहेत. लालकृष्ण आडवाणी हे भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा अध्यक्षही राहिले आहेत.





